नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने, आज रात्री १२ वाजल्यापासूनसंपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन अर्थात संचारबंदी आज प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनी जाहीर केली.त्यामुळे येत्या १४ एप्रिलपर्यंत नागरिकांनी अजिबात घरातून बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले. प्रधानमंत्र्यांपासून छोट्यातल्या छोट्या व्यक्तीसाठी हीसंचारबंदी लागू असणार असल्याचे स्पष्टीकरण प्रधानमंत्र्यांनी आज दिले.
केवळ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांनाच नव्हे तरइतर सर्वांनाही एकमेकांपासून अंतर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आहे तिथेच पुढचे २१ दिवस रहा असे कळकळीचे आवाहन त्यांनाही केले. देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याशिवाय इतर कुठल्याही कारणासाठी घरातून बाहेर पडू नका असे त्यांनी सांगितले.
भारताला आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला कोरोनापासून वाचवण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहन त्यांनी केले. संचारबंदीच्या निर्णयाची मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागेल मात्र कोरोनाच्या विरोधातल्या लढाईतील हे आवश्यक पाऊल आहे असे ते म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी एकमेकांपासून अंतर ठेवावे, घरातच रहावे असे ते म्हणाले. कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी २१ दिवस आवश्यक असल्याचं अभ्यासाअंती आणि वैद्यकीय तज्ञांचं मत जाणून घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं. घरातून बाहेर ठेवलेले एक पाऊल कोरोनाविषाणूचा संसर्ग तुमच्या घरात आणू शकेल, कोरोना विषाणू शरीरात असला तरी त्याची लक्षणे दिसायला जास्त दिवस लागतात, याकाळात ती अनेकांच्या संपर्कात येते. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे कोरोना विषाणू बाधित एक व्यक्ती आठवडाभरात शेकडो लोकांना या विषाणूचा संसर्ग करू शकते, त्यामुळे प्रत्येक नागरिकानं खबरदारी घ्यावी असं ते म्हणाले.
कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य पायाभूत सेवांसाठी, केंद्र सरकारनं १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून आरोग्य सुविधा आणि आरोग्यसाहित्यात वाढ केली जाईल असे त्यांनी सांगितले. लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, सरकारच्या आणि प्रशासनाच्या निर्देशांचं पालन करावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला. या बंधनांचा स्वीकार करा आणि कोरोनावर मात करा असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केले.