मुंबई : नाशिक येथे नवीन वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेद / होमिओपॅथी / फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
नाशिक येथे नवीन वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेद / होमिओपॅथी / फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याबाबत बैठक मंत्रालय येथे बैठक झाली.
श्री. भुजबळ म्हणाले, उत्तर महाराष्ट्राच्या जनतेची मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे. हे महाविद्यालय नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारातच होणार आहे. या महाविद्यालयासाठी नाशिकमधील जिल्हा सामान्य रुग्णालय संलग्नित करणे आवश्यक असून, वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात तीन वर्षांसाठी रुग्णालय करार करण्यात येईल. याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर असे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू केले जातील. या महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रशासकीय बाबी तत्काळ पूर्ण कराव्यात, असे निर्देशही श्री.भुजबळ यांनी यावेळी दिले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिपक म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.