मुंबई (वृत्तसंस्था) : देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्तानं पोलिस संचलनही झालं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुरूवातीला हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केलं.

कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या २६ पोलिस अधिकारी आणि २४० पोलिस अमलदारांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांच्या पवित्र स्मृतिंना विनम्र अभिवादन केलं. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराजे देसाई उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, सीमेवर शत्रुशी लढताना तसंच दहशतवाद आणि नक्षलवादाचा बिमोड करताना पोलिसांनी हौतात्म्य पत्करलं आहे.

आठ महिने पोलिस कोरोनासारख्या अदृष्य शत्रुशी लढत आहेत. त्यांच्या देशभक्ति आणि कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय पोलिस जगात सर्वोत्कृष्ट असल्याचंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे.