शहरातील गतिरोधक मृत्युचे सापळे बनत आहेत

624

पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाने शहरात ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’, ‘फ’, ‘ग’, ‘ह’, या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बसवले आहेत, तथापी सदरच्या गतिरोधकांमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांची संख्या पाहता, गतिरोधक म्हणजे मृत्युचे सापळे बनत आहेत. गतिरोधकांमुळे नागरिकांना पाठीच्या मणक्याचे विकार जडत आहेत.

यासर्व विषयाच्या अनुषंगाने मंगळवार रोजी जागृत नागरिक महासंघातर्फे अध्यक्ष नितीन यादव, सहसचिव उमेश सणस, सांगवी महिला अध्यक्ष सुनीता साळुंखे व सदस्य कदम या शिष्टमंडळाने मनपा स्थापत्य विभाग ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय उपअभियंता मा. धनंजय गवळी आणि मा. श्री दांगडे यांच्या सोबत कासारवाडी येथे शंकरवाडी ते ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयादरम्यानच्या सर्व गतिरोधकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी मध्ये 11 गतिरोधकांपैकी 6 गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने बनवल्याचे आढळून आले आहे. शिवाय सदर एकाही गतिरोधकांबाबतचे कोणतेही अभिलेख कार्यालयात उपलब्ध नाहीत.

विशेष म्हणजे कायद्यानुसार वाहतूक पोलिसांच्या लेखी परवानगीशिवाय एकही गतिरोधक बनवता येत नाही, पण मनपाने कायदा धाब्यावर बसवून वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता, सर्व गतीरोधक बनवलेले आहेत. तसेच गतिरोधक बनवताना वाहन चालकाच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधकाच्या दोन्ही बाजूला 50 मी अंतरावर ” सावधान पुढे गतिरोधक आहे ” असा फलक लावणे कायद्याने बंधनकारक असताना, इथे तोही कायदा धाब्यावर बसवून कोणताही फलक लावलेला आढळून आला नाही.

मनपाने नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी चालवलेला खेळ तात्काळ थांबवावा आणि शहरातील सर्व गतिरोधक काढून ते शास्त्रीय पद्धतीने आणि वाहतूक पोलिसांच्या परवानगीने बनवावेत तसेच गतिरोधकांमुळे अपघात अथवा दुर्दैवी मृत्यू झाल्यास याला मनपा प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल.

असे निवेदन मनपा आयुक्त मा. श्रावण हर्डीकर यांना देणार आहोत. वाहतूक पोलीसांची परवानगी न घेता गतिरोधक बनवल्यामुळे चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.

अशी माहिती जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन यादव यांनी साप्ताहिक एकच ध्येयला दिली.