राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची ग्वाही

436

मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये जनताच महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने सर्व समाजघटकांना प्रोत्साहित करुन करुन बळ देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीकोनातून अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या असून सर्वसमावेशकता जपण्यात आली आहे, असे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वित्तमंत्र्यांनी आपल्या मनोगतातून राज्याची आर्थिक स्थिती, औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक, जलयुक्त शिवार योजनेमुळे झालेल्या कृषीउत्पादनातील वाढ, प्रधानमंत्री पीक विमा योजना, महागाईमध्ये झालेली घट आदींसह विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यावरील ऋणभार मागील पाच वर्षापूवी 28.2 टक्क्यांपर्यंत गेला होता तो 15 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी याबाबी करुनही ऋणभार कमी करण्यात यश मिळाले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगना आदी राज्यांचा ऋणभार महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. त्यामुळे राज्य कर्जबाजारी असल्याचा प्रचार चुकीचा आहे.

राज्याच्या उत्पन्नात वाढ होत आहे. 2011-12 मध्ये राज्याचे उत्पन्न 56 हजार 972 कोटी रुपये, 2013-2014 मध्ये 69 हजार 777 कोटी रुपये होते. 2018-19 मध्ये हे उत्पन्न 1 लाख 28 हजार 895 रुपये इतके झाले आहे.