नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात वावरताना एकमेकापासून अंतर राखणं हाच कोविड-१९च्या प्रसाराला आळा घालण्याचा सर्वोत्तम मार्ग असून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं लक्ष्मणरेषा पाळणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून आज ते देशवासियांशी संवाद साधत होते.
कोरोना विषाणूपुढं साऱ्या जगाची हतबलता पाहता संचारबंदीचं कठोर पाऊल केवळ १३० कोटी देशवासियांच्या हितासाठीच उचलावं लागलं, असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यामुळं जनतेला झालेल्या त्रासाबद्दल आपण दिलगीर आहोत असं मोदी म्हणाले.
मानवजातीच्या अस्तित्वाला धोका ठरलेल्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक भारतीयाचा निर्धार आणि संयम कामी येणार आहे. असं ते म्हणाले.
संचारबंदीचं उल्लंघन म्हणजे आयुष्याशी खेऴ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले की जगात इतरत्र याबाबत हयगय झाली आणि नंतर पश्चात्तापाची वेळ ओढवली.
COVID-19 चं संकट अभूतपूर्व असल्यानं त्यावर उपायही अभूतपूर्व असेच करणं भाग आहे. या अभूतपूर्व लढ्यात भारताचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गरिबांप्रति सहानुभूती भारतीय संस्कृतीचं अंगभूत लक्षण असून भुकेल्याला अन्न देणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. असं प्रधानमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये पुण्याच्या नायडू रुग्णालयातले डॉ. रोहिदास बोरसे यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला.