नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी काल पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी हा राष्ट्रीय निधी वापरता येईल.
प्रधानमंत्री स्वतः या निधीचे अध्यक्ष असून संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री या ट्रस्टचे सदस्य आहेत. यात दिलेली देणगी कर सवलतीला पात्र असून पी एम इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन पीएम-केअर्स निधीत योगदान देता येईल.
पीएम-केअर्सचा खाते क्र. 2121PM20202 असून SBIN0000691 याचा आय एफ एस सी कोड आहे, तर SBININBB104  हा स्विफ्ट कोड आहे. pmcares@sbi हा यु.पी.आय. आयडी आहे.
कोरोना विषाणूच्या उच्चाटना करिता निर्माण केलेल्या, प्रधानमंत्री केयर्स या मदत कोशात देशभरातून मोठ्या प्रमाणावर निधीचा ओघ सुरु झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एक महिन्याचे वेतन या निधीत जमा केले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी २० कोटी रुपयांचा निधी या कोशात जमा केला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या एका दिवसाच्या वेतनाच्या माध्यमातून २१ लाखांचा निधी या कोशात जमा केला आहे.
प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला साद देत भारतीय रेल्वे १५१ कोटी रुपयांचा निधी या कोशात जमा करेल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. रेल्वेराज्यमंत्री सुरेश अगाडी आपलं एक महिन्याचं वेतन या कोशात जमा करणार आहेत, तसंच १३ लाख रेल्वे कर्मचारी देखील आपल एका दिवसाचं वेतन या मदत कोशात जमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.