नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितलं.
भारतात कोरोना  रुग्णांची संख्या १०० वरुन एक हजार पर्यंत पोहोचण्यासाठी १२  दिवस लागले. इतर प्रगत आणि विकसित देशात ज्यांची लोकसंख्या तुलनेनं कमी आहे, तिथे ही संख्या एवढ्याच काळात आठ हजारापर्यंत पोहोचली. जनसहभाग आणि प्रतिबंधक उपायांमुळेच कोरोनाच प्रादुर्भाव आपण आटोक्यात ठेवू शकलो असं अग्रवाल यांनी सांगितलं.
देशातल्या कोरोनाग्रस्तांपैकी ९९ रुग्ण बरे झाल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.  देशातली एकूण रुग्णसंख्या १ हजार ७१ असून आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या २४ तासात ९२ नवे रुग्ण आढळले.