नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची अजिबात कमी नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. संचारबंदी नंतर जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी माणसे आणि यंत्रणा एकत्र करतांना थोडा वेळ लागला त्यामुळे जनतेला थोडा त्रास झाला.त्यासाठी दिलगिरी व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, आता ही वितरण साखळी सक्षमपणे कार्यान्वित झाली आहे. येत्या एक दोन दिवसात हा प्रश्न पूर्णपणे सुटेल.
खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नये, सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असलेले रुग्ण सरकारी दवाखान्यात पाठवा परंतू इतर रुग्णांना वैद्यकीय सेवा द्या, घाबरून जाऊ नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एसीचा वापर टाळावा, थंड पाणी, थंडपेय, थंड सरबत पिऊ नये. यामुळे नेहमीच्या पद्धतीने होणारे सर्दी-पडशासारखे आजार दूर ठेवता येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र सरकारच्या यादीत सुरुवातीला जे देश नव्हते त्या देशातून जे नागरिक- पर्यटक आले, त्यांनी कोणतीही माहिती न लपवता पुढे यावे, लक्षण आढळली तर पटकन उपचार करून द्यावेत कारण योग्य वेळी उपचार झाले तर जीव वाचू शकतो हे ही या दरम्यान स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्थलांतरितासाठी राज्यात जवळपास १ हजार केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. त्यात जवळपास दोन- सव्वादोन लाख स्थालांतरीत लोक आणि मजुरांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांना अन्न, औषधं याचा पुरवठा केला जात असल्याचीही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.