नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ नागरिकांमधील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार जेष्ठांनी घरीच थांबावं, घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणं टाळावं. थोड्या-थोड्या वेळाने आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवावेत, घरी बनवलेला ताजा आणि पोषक आहार घ्यावा, वारंवार भरपूर पाणी प्यावं, शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचा रस घ्यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
मोती बिंदू, गुडघा प्रत्यारोपण यासारख्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. सर्दी, कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा, असंही सांगण्यात आलं आहे.
याशिवाय बाजारपेठा, आठवडी बाजार, किराणा दुकान, धार्मिक स्थळं, बगिचे वगैरेंना भेटी देण्याचे टाळून घरातच आराम करण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.