राज्याला मदतनिधी देण्याऐवजी दिले केंद्राला वेतन; माणुसकीपेक्षाही पक्ष मोठा!
पिंपरी : देशात उद्भवलेल्या ‘कोरोना’ आणीबाणीत राज्याला आर्थिक मदत करण्याऐवजी केंद्रातील भाजपच्या सर्वोच्च नेत्याला खुश करण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आमदार व नगरसेवक मग्न असल्याचे दिसून येत आहे. महामारी कोरोना संकटाशी लढताना ‘माणुसकी’ ची अपेक्षा प्रत्येकाकडून आहे. मात्र, शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे आमदार व नगरसेवकाचे एक महिन्याचे वेतन चक्क देशाच्या सर्वोच्च कारभाऱ्याकडे सोपवून कुटील राजकारण केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर भाजपकडून मदतनिधीतही ओंगळवाणे राजकारण दिसत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी आपल्या एक महिन्याचे वेतनराज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना देऊन राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यात आपला खारीचा वाटा उचलून तमाम महाराष्ट्रीयांसाठी ‘माणुसकी’ दाखवली आहे. सध्या राज्यात तसेच देशात ‘कोरोना’ व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे.राज्यसरकार तसेच केंद्रसरकारने या पार्श्वभूमीवर देशवासियांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार दानशूर व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, विविध आस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापले एक महिन्याचे वेतन कोरोना संकटाशी लढण्यासाठी दिले.
कोरोना या संकटाशी सध्या सुरू असलेल्या लढ्यात ‘माणुसकी’चीच अपेक्षा असताना पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी मात्र मदतीतही ‘पक्ष’पातीपणा आणून आपल्या ओंगळवाण्या राजकारणाचे दर्शन घडवले असल्यामुळे सर्वत्र चीड व्यक्त होत आहे. ‘लॉकडाऊन’मुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता कोरोना निधी’ ला मदत करण्याऐवजी केंद्राकडे म्हणजेच ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’ला शहरातील दोन भाजप आमदारांसह सर्व नगरसेवकांनी आपला एक महिन्याचा पगार देऊन ‘माणुसकी’पेक्षा पक्षच मोठा असल्याचा या दाखवून दिले आहे.
देशात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. त्यांच्यावर राज्य सरकार, तसेच मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून योग्य उपचार चालू आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत देशभर ‘लॉकडाऊन’ केले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. यामुळे राज्य सरकारला मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच कोरोनाविरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ३८ नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले. संकटकाळात पक्ष मोठा नसून माणुसकी आणि आपले राज्य महत्त्वाचे आहे, हेच शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले असून यावरून तरी सत्ताधारी भाजप मधील अंधभक्त बोध घेतील का असा सवाल वाघेरे यांनी याद्वारे उपस्थित केला आहे.