मुंबई, पुण्यातील मार्केट यार्डासह थेट किरकोळ विक्रेत्यांकडे पोचला भाजीपाला
मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुरेशा प्रमाणात भाजीपाला, फळे, कांदे-बटाटे आदींचा पुरवठा झाला असून इतर शहरांमध्येही विनाव्यत्यय भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येत आहे. भाजीपाल्याचा तुटवडा होणार नाही, याची राज्य शासनामार्फत दक्षता घेण्यात येत आहे.
शेतकरी गटामार्फत थेट मुंबई उपनगरात भाजीपाला पोच
काल शुक्रवारी, वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)मध्ये 114 ट्रक व टेम्पोमधून भाजीपाला व कांदा-बटाटा यांची थेट आवक झाली आहे. त्याचबरोबर 175 वाहनांनी थेट मुंबई शहर व उपनगरामध्ये भाजीपाला व फळे पोचविण्यात आली आहेत. मुंबई उपनगर भागातील किरकोळ विक्रेत्यांकडे विविध 194 शेतकरी गटांमार्फत थेट भाजीपाला पोचविण्यात आला आहे.
मुंबई शहरामध्ये भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरू असून भाजी मार्केटमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच भाजीपाल्याचा किमती नियंत्रणात ठेवण्यात येत आहेत.
पुण्यातही कांदा-बटाटा, भाजीपाल्याची मोठी आवक
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात काल 285 वाहनातून एकूण 10 हजार टन कांदा व बटाट्याची आवक झाली आहे. तसेच पुण्यातील एपीएमसीच्या मुख्य यार्डाबरोबरच मांजरी व खडकी येथील उप यार्डात 235 वाहनातून एकूण 7 हजार 900 क्विंटल ताजे भाजीपाला व फळांची आवक झाली आहे.
नागपुरात साडेचार हजार क्विंटल भाजीपाला व फळांची आवक
नागपूरमधील कळमना येथील मुख्य बाजार पेठेत 59 ट्रक/टेम्पोच्या माध्यमातून 4 हजार 965 क्विंटल भाजीपाला व फळांची आवक झाली असून यामध्ये भाजीपाला, कांदा, बटाटा, लसूण यांच्यासह विविध फळांचा समावेश आहे.
एपीएमसी मार्केटअंतर्गत येणाऱ्या धान्य बाजारावरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. भाजीपाला व धान्याच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.
दुधाचा पुरवठा सुरळीत
गेल्या काही दिवसात दूध, दही, पनीर, ताक, लस्सी या दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा होण्यात अडचणी येत होत्या. मात्र, पोलीस विभागाच्या सहकार्याने या अडचणी सोडविण्यात आल्या असून दुग्धजन्य पदार्थांचा सुरळीत करण्यात सुरुवात झाली आहे. अमूल, चितळे, गोकुळ, प्रभात, गोवर्धन इत्यादी महत्त्वाच्या कंपन्यांचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादने ही दुकाने व किरकोळ विक्रेत्यांकडे पोहचण्यास सुरूवात झाली आहे.