मुंबई (वृत्तसंस्था) : दोन एप्रिलच्या संध्याकाळी सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो. डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांनी निवारा केंद्राची माहिती दिली होती. ती प्रत्यक्ष पहावी म्हणून तिथे पोहोचलो. कोरोना आल्यामुळे अनेक मजूर बेरोजगार झाले होते. जेथे काम करत होते. त्या मालकांनी त्यांची दखल घेतली नव्हती. लॉकडाऊन असल्याने वाहतूक व्यवस्था बंद होती. सोबत असणाऱ्या लोकांच्या लोंढयाबरोबर गावाकडे चालत निघालेली अनेक लोक त्यात होते. शासनाने आदेश काढले आणि या सर्व लोकांना उपलब्ध जागेच्या नुसार आवश्यक तेथे राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार सिडको एक्झिबिशन सेंटरला 280 पेक्षा अधिक लोक आश्रयाला होते.
सहज चौकशी केली. तेव्हा लक्षात आले. श्री.भुपेश गुप्ता हे व्यापारी आहेत. त्यांची आयऑन केबल नावाची कंपनी आहे. त्यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि आवश्यक ते साधनसामुग्री या लोकांना पुरविली आहे. कोणतीही प्रसिध्दी नाही की कोणतीही अपेक्षा नाही. कोरोनामुळे विस्तापित झालेल्या लोकांना सन्मानाने जगता यावे यासाठी केलेली ही माणुसकीपोटी मदत म्हणून श्री.गुप्ता यांनी सहकार्य केल्याचे दिसत होते. हे केवळ एका दिवसापुरते नाही तर 14 एप्रिल पर्यंत दोन वेळचे जेवण देण्याची त्यांची तयारी दिसून आली. माणसातले माणूसपण यातून दिसून आले.
तेथील एकाला विचारले, तो सांगू लागला. मी रामकिशन. मुळगांव बिहार येथे मी बांधकामाचे काम करतो. महाराष्ट्र शासनाने आम्हाला नुसताच निवारा नाही तर दोन वेळेला पोटभर जेवण मिळेल याचीही सोय करून दिली. गावी आम्हाला संपर्क साधण्यासाठी फोनही उपलब्ध करून दिला जातो. मधून मधून डॉक्टरही येऊन जातात. सरकारचे खूप उपकार आमच्यावर आहेत.
कोकण विभागात आजच्या तारखेला 30 हजारापेक्षा जास्त लोक 400 पेक्षा अधिक ठिकाणी राहत आहेत. शासन त्यांच्या जेवणाची सोय आणि राहण्याची सोय करीत आहे. स्वंयसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती यासाठी स्वता:हून पुढाकार घेता आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. विभागीय आयुक्त श्री.शिवाजी दौंड यांच्या अतिसुक्ष्म नियोजनामुळे बेरोजगार, निवाराहीन आणि स्थलांतरीत लोकांना हक्काचा निवारा प्राप्त झाला आहे. संकटसमयी महाराष्ट्राची दातृत्वाची ही बाब या एकाच सेंटरमधून दिसून येत होती. स्वंयशिस्त आणि सामाजिक शिस्त या जोरावर गरीब गरजूंना निवारा मिळाला. हेच कोरोनावर मात करण्याचे उदाहरण म्हणावे लागेल. शासनाचे हात पाठीशी आहेत म्हणूनच कोरोना संकट गंभीर असतांना शासन खंबीरपणे उभे आहे. मदतीसाठी तत्पर आहे. हे विशेष होय…