मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कामगार विभागाची संपूर्ण यंत्रणा सातत्याने कार्यरत आहे. याबाबत राज्यातील कामगारांच्या निर्माण होणाऱ्या रोजगारासंबंधी अडचणींचे निराकरण करण्यासाठी कामगार विभागातर्फे नियंत्रण कक्ष स्थापन करून विभाग निहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.
कामगारांनी संबंधित संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या परिस्थितीत उद्भवणाऱ्या रोजगारा संबंधी अडचणींचे निराकरण करून घेण्याचे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.