नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज सकाळी कोलकत्ता इथं राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजभवनात झालेल्या साध्या समारंभात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधे भाजपा कार्यकर्त्यांवरझालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस, राज्य भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर भाजपाचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी नागपुरात टिळक पुतळा इथं आज सकाळी आंदोलन केलं.

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही आज बीड इथल्या भाजपा कार्यालयाबाहेर बंगालमधल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला.

या हिंसाचाराच्या विरोधात आज उस्मानाबाद इथं भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज धुळ्यात भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. यावेळी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या सोबत भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत लक्ष वेधलं.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल कॉग्रेसचे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भाजपा समर्थक मारले गेले आहेत. असा आरोप डॉ भामरे यांनी केला.