मुंबई : देशात सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि जमावबंदीचा आदेश लागू असताना 2 एप्रिल रोजी मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून काही व्यक्ती लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पोहोचले. यापैकी आठ यात्रेकरू कोरोनाग्रस्त असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या घटनेची वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात यात्रेकरूंना निलंगा येथील मशिदीमध्ये आश्रय देण्यात आला होता. खरेतर असे अनोळखी इसम आढळून येताच याची माहिती संबंधितांनी पोलीस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने द्यावयास हवी होती. याप्रकरणी मशीद आणि मशिदीचे कार्यवाह यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील सर्वच निष्पाप नागरिकांना धोका निर्माण करण्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेची कठोर शब्दात निंदा करीत असल्याचे सांगून यापुढे जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येकाने कायद्याचे कठोर पालन करावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.