मुंबई :  ग्राहकांना अन्न पदार्थ देतांना ते  स्वच्छ व सुरक्षित राहतील याची दक्षता प्रत्येक छोट्या आणि मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घ्यावी आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे यासाठी ‘सुरक्षित अन्न शहर अभियान’ राबविण्यात येणार आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. खाद्यपदार्थांच्या हाताळणीत स्वच्छता राखण्यासंदर्भात हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

ग्राहकांसाठी सुरक्षित अन्न शहर अभियान याअंतर्गत प्रत्येक खाऊ गल्लीची तपासणी करण्यात येणार आहे. विक्रेत्यांचा विशिष्ट ड्रेसकोड, हातमोजे, डोक्यावर टोपी, स्टॉल व स्टॉलच्या परिसरात स्वच्छता, ग्राहकांना पिण्यासाठी दिले जाणारे पाणी, स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पाणी, कर्मचारी व ग्राहकांना हात धुण्यासाठी हॅण्ड वॉश, अन्न पदार्थ झाकून ठेवण्याची पद्धत, कचराकुंडी, ओला कचरा, सुका कचरा यांचे विलगीकरण यासारख्या तपासण्या केल्या जाणार आहेत.

ज्या स्टॉल धारकाचा व्यवसाय हा बारा लाख वार्षिक उलाढालीच्या आत असेल, त्यांची नोंदणी  तपासून घेतली जाईल. नसल्यास ती करून घेण्यात येईल. बारा लाखापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असेल त्या विक्रेत्यांची नोंद करून अशा विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी सांगण्यात येईल.

अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी दिली अकस्मात भेट

राज्यात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी लवकरच त्यांना ड्रेसकोड लागू करण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली होती. या ड्रेसकोडमध्ये त्यांना विशिष्ट गणवेष, हातमोजे, टोपी आदींचा समावेश असेल. नागरिकांचे आरोग्य जास्तीत जास्त सुरक्षित राहावे यादृष्टीने यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. डॉ. शिंगणे यांनी विधिमंडळात घोषणा केल्यानंतर लगेच याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पावले उचलली. खाऊगल्लीतील अन्नाची सुरक्षितता तपासून बघण्यासाठी  विधान भवनाजवळील खाऊगल्लीत त्यांनी प्रत्यक्ष अकस्मात भेट दिली. यावेळी त्यांनी खाद्य पदार्थ विक्रेते त्याचबरोबर ग्राहकांसोबत संवाद साधला.

या अधिवेशनातच त्यांनी दुधातली भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे  तसेच वजन कमी-अधिक करण्यासाठी, तसेच शरीरसौष्ठवासाठी उत्तेजके (स्टेरॉईड) देणाऱ्या व्यायामशाळांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यभर मोहीम राबविणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे.