नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या इराणमधे अडकलेले भारतीय यात्रेकरू आणि विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार इराणच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत दिली. कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उद्या केंद्र सरकार सर्व राज्य आणि रुग्णालयांची एक दिवसाची राष्ट्रीय स्तरावरची कार्यशाळा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नोवेल-कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकार सतत जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधून आहे, असंही त्यांनी सांगितलं. देशभरात कालपर्यंत या विषाणूमुळे बाधित झालेले 29 रुग्ण आढळले असून त्यापैकी तिघेजण संपूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असं ते म्हणाले.
या समस्येचा सामना करण्यासाठी रुग्णांचा शोध, प्रयोगशाळेत नमुने तपासणी, आरोग्य कर्मचार्यांचं प्रशिक्षण आणि रोगाच्या धोक्याबाबत जनजागृती या माध्यमातून सरकार कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. वैयक्तिक आरोग्य सुरक्षेची उपकरणं आणि N95 मास्क यांचा पुरेसा साठा राज्य तसंच केंद्र सरकारकडून केला जात आहे आणि त्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या निर्यातीवर मर्यादा घालण्यात आली आहे.