मुंबई :  ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल असा विश्वास देणारा फोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी ताई म्हटले आणि मला माझा भाऊच  माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यासारखे वाटले. मुख्यमंत्री सरांनी मला मदत केली. मी आताच महाराष्ट्र सदनमध्ये राहण्यासाठी आले. आता मुंबईला कधीही जायला मिळो, मला आत्ताच घरी आल्यासारखे वाटतेय, माझ्या लोकांमध्ये आल्यासारखे वाटतेय, इस्त्राईलहून दिल्लीला परतलेल्या पण लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडलेल्या श्रीमती एलिझाबेथ पिंगळे आनंदाने सांगत होत्या.

एलिझाबेथ पिंगळे, मुलुंडच्या रहिवाशी, आजारी वडिलांना भेटायला इस्त्राईलला गेल्या. दुर्दैवाने वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे तेथील वास्तव्य लांबले. त्या २१ मार्चला निघून २२ मार्चला नवी दिल्लीत पोहोचल्या. संध्याकाळी मुंबईचे विमान होते. परंतु त्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले गेले. त्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाल्या. १४ दिवसानंतर अचानक हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना हॉटेल बंद होत असल्याचे कारण सांगत त्यांची सोय दुसऱ्या हॉटेलमध्ये केली व ते पसंत नसल्यास स्वत:ची व्यवस्था स्वत: करण्यास सांगितले.

श्रीमती एलिझाबेथ यांनी स्वत:सह महाराष्ट्रातील ४० जण येथे अडकले असून  या सर्वांना मदत करावी असा संदेश देणारा व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्सअप वर टाकला. या व्हिडिओची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एलिझाबेथ पिंगळे यांच्याशी नवी दिल्ली येथे दूरध्वनीहून संपर्क साधला आणि त्यांची व्यवस्था महाराष्ट्र सदन येथे करण्यात येत असल्याचे सांगितले. १४ दिवसांच्या क्वारंटाईननंतर आणि आरोग्य विभागाच्या मान्यतेनंतर आज त्या महाराष्ट्र सदन येथे सुखरूप पोहोचल्या.

तुम्ही एकट्या नाहीत. घाबरून जाऊ नका. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत हे सांगणारा आश्वासक संवाद आणि पुढे केलेला मदतीचा हात पाहून मी खूप भारावून गेले आहे. आपल्याच माणसांनी इतकी आस्थेवाईकपणे चौकशी केली. माझी व्यवस्था केली. मी त्या सगळ्यांची विशेषत: मुख्यमंत्री, त्यांचे प्रधान सचिव विकास खारगे सर, महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि इतर अधिकारी या सगळ्यांची खूप आभारी आहे. एलिझाबेथ पिंगळे सांगत होत्या आणि त्यांच्या प्रत्येक शब्दामधून उत्साह आणि आनंद ओतप्रोत डोकावत होता.

क्वारंटाईन कालावधी संपलेल्या महाराष्ट्रातील रहिवाशांची सदनात सोय – समीर सहाय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार परदेशातून नवी दिल्ली येथे आलेल्या आणि क्वारंटाईन होण्यास सांगितलेल्या परंतु आता क्वारंटाईन कालावधी संपला आहे आणि त्यांना आरोग्य विभागाने घरी जाण्यास मान्यता दिली आहे अशा महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांची लॉकडाऊन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी महाराष्ट्र सदन येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती  महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी दिली आहे. ते म्हणाले की विविध देशातून महाराष्ट्रात जाण्यासाठी आलेले नागरिक होम क्वारंटाईनमुळे आणि नंतर लॉकडाऊनमुळे राज्यात परत जाऊ शकले नाहीत यात इटलीहून परतलेले १५ विद्यार्थीही आहेत. या सर्वाची लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत महाराष्ट्र सदनात व्यवस्था करण्यात आली आहे. काही जण राहण्यासाठी सदनात आले देखील आहेत. उर्वरित लोक त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर आरोग्य विभागाच्या मान्यतेने सदनात दाखल होणार आहेत असेही ते म्हणाले. उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने  महाराष्ट्रातील रहिवाशांची अशा पद्धतीने नवी दिल्ली येथे व्यवस्था करणारे महाराष्ट्र सदन हे एकमेव सदन ठरले आहे अशीही माहिती त्यांनी दिली.