नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींनी याची माहिती स्वतःहून देण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर ही माहिती देण्याचा आवाहन करण्यात आले आहे. स्वतःहून ही माहिती न देणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात व्हिसा अटी आणि शर्तीचं उल्लंघन करून कोरोना साथीच्या काळात प्रार्थना स्थळावर एकत्र जमून धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 29 परदेशी नागरिक आणि सहा भारतीयां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परदेशी नागरिक कायदा 1946 कलम 14 ब, प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन, जमावबंदीचं उल्लंघन, भारतीय साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन आदी कायद्यांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनापासून बचावासाठी सुरु असलेल्या संचारबंदीतही कोल्हापुरात अवैधरित्या दारुविक्री करणारी १ हजार २२६ दुकानं राज्य उत्पादन आणि दारूबंदी विभागानं सील केली आहेत. संचारबंदी पूर्णपणे शिथिल होऊन जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत या सर्व दुकानांचं सीलं कायम राहील, अशी माहिती अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. यानंतरही चोरट्या मार्गानं होणारी दारू विक्री रोखण्यासाठी गस्ती पथकं वाढवली असल्याचंही त्यांनी सांगितलं.