नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ या आजाराच्या साथीचं गांभीर्य ज्यांना समजलं अशा मोजक्या देशांपैकी भारत एक आहे, आणि देशानं याबाबतीत समयोचित लढा पुकारला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त ते पक्ष कार्यकर्त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते.
या साथीविरुद्ध भारतानं उचललेली पावलं जगासाठी वस्तुपाठ असल्याचं ते म्हणाले. भारतानं एकापाठोपाठ एक निर्णय घेतले आणि त्यांचा फायदा तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचवण्याची काळजी घेतली. सर्व राज्यसरकारांमधे तसंच तज्ञांमधे ताळमेळ राहील याची काळजी घेतली. कोविड १९ विरुद्धचा लढा देश अथकपणे लढून जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या लढ्यात जनतेने अभूतपूर्व शिस्त आणि परिपक्वतेचं दर्शन घडवलं आहे असं सांगून ते म्हणाले की काल रात्री 9 वाजता ज्योती उजळून १३० कोटी देशवासियांनी एकतेचं दर्शन घडवलं.
राष्ट्र प्रथम ही शिकवण भाजपाने सुरुवातीपासूनच अंगिकारली असल्याचं सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना 5 आवाहनं केली. गरजूंना अन्नधान्य मिळवून द्यावं, स्वतःखेरीज इतर 5-6 जणांसाठी मास्क बनवावे, आरोग्यसेतू अॅपविषयी इतरांना माहिती द्यावी, PM CARESनिधीला देणगी द्यावी आणि इतर 40 जणांनाही उद्युक्त करावं, तसंच कोविड १९ विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर काम करणाऱ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.