नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचाऱ्यांना आता कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात मुंबईतल्या वोकहार्ट आणि जसलोक रुग्णालय, पुण्यातल्या पिंपरी इथल्या डी. वाय. पाटील रुग्णालय आणि औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाचा समावेश आहे.

मुंबई सेंट्रल इथल्या वोकहार्ट रुग्णालयातले ३ डॉक्टर आणि २६ परिचारिकांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे हे रुग्णालयं सील करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे.

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानं जसलोक रुग्णालयातली एका परिचारिकेलाही कोरोनाची लागण झाल्याचं मागच्या आठवड्यात स्पष्ट झालं होतं. त्यानंतर जसलोक रुग्णालयातला बाह्यरुग्ण विभाग बंद केला असून, कोणत्याही नव्या रुग्णाला दाखल करून घेतलेलं नाही.

पुण्यात पिंपरी इथल्या डॉ. डी. वाय. पाटील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातग्रस्त रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर या रुग्णावर उपचार करणाऱ्या ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवलं आहे.

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या पुरुष परिचारकालाही या विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर त्याच्या संपर्कात आलेले डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येलीकर यांनी दिली आहे.