नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सर्व राज्यपालांनी येत्या वर्षभरासाठी स्वतःच्या वेतनात ३० टक्के कपात करण्यासाठी संमती दर्शवली आहे. याशिवाय प्रधानमंत्री, केंद्रसरकारचे सर्व मंत्री, सर्व खासदार यांच्या वेतनात येत्या वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.

यासाठीचा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून आगामी अधिवेशनात यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक सादर केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली.

चालू महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यातून बचत होणारी रक्कम केंद्र सरकारच्या निधी मध्ये जमा केली जाणार आहे. याशिवाय चालू आणि आगामी आर्थिक वर्षासाठीचा सर्व खासदार निधीही केंद्रसरकारच्या निधीत जमा केला जाणार आहे. यातून सुमारे ७ हजार ९०० कोटींचा निधी जमा होणार आहे.