नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हनुमान जयंतीचा सण उद्या असून त्यासाठी घराबाहेर पडू नये. तसंच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनासंसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरच्या व्यक्तीच्या संपर्कात न येणं, आणि कोरोनाला प्रसाराची संधी न देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बंदीआदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
कोरोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोनाप्रसाराला कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
शब-ए-बारात या सणाच्या दिवशीही मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचे नियम पाळत घरातच नमाज अदा करावी असं आवाहन अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी आज केलं. नियम पाळण्यात हयगय केल्यास त्याचे दुष्परिणाम आपण आणि आपले कुटुंबीय तसंच राष्ट्राला भोगावे लागतील असेही ते म्हणाले. केंद्रीय वक्फ बोर्डासह अनेक धार्मिक नेते आणि सामाजिक संस्थांनीही लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केले आहे.