पुणे : पुणे जिल्ह्यामधील खेड शिवापूर टोलनाक्यासंबंधी स्थानिक नागरिकांचा विरोध, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळास स्थानिक शेतक-यांचा तीव्र विरोध, पुणे नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असून त्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा तीव्र विरोध तसेच पुणे सातारा महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम चालू असून अतिक्रमण झालेल्या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. तसेच जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एन.आर.सी.)/ नागरिक संशोधन कायदा (सी.ए.ए) बाबत तसेच इतर मागण्यांकरीता विविध पक्ष व संघटनांकडून आंदोलने रॅली मोर्चे, रास्ता रोको, निदर्शने होत आहेत.

तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्राप्त जमावबंदी /संचारबंदी आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना दि. 09 एप्रिल 2020 रोजी 00.10 वा. पासून ते दि. 21 एप्रिल 2020 रोजी 24.00 वा. पर्यंत अ)  रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणा-या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रीतीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळेत काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे,  सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी, सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यांमध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या, व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये देवालय आणि इतर सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे,  कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यांजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविणे विनियमन करणे  व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे,  सक्षम प्राधिका-यांनी या अधिनियमांची कलम 33, 35 व 37 ते 40, 42, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे याप्रमाणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अधिकार प्रदान केले आहेत.