नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या लढ्यासाठी आशियाई विकास बँकेनं भारताला २ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलर अर्थसहाय्य्य देण्याची ग्वाही दिली आहे. बँकेचे अध्यक्ष मसत्सुगु आसकावा यांनी राष्ट्रीय आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमासह भारत सरकारच्या ठोस प्रतिसादाबाबत प्रशंसा केली आहे.
लॉकडाऊनमुळे बाधित झालेल्या गरीब, महिला आणि कामगारांसाठी भारत सरकारनं जाहीर केलेल्या १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्यता पॅकेजचीही बँकेनं प्रशंसा केली आहे. जागतिक आर्थिक वाढीच्या मंदावलेल्या वेगामुळे भारतात व्यापार आणि उत्पादन उद्योगांची साखळी काहीशी खंडित झाल्याचं बँकेनं जरी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.