अलिबाग : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिल, मे व जून 2020 मध्ये दरमहा नियमित योजना निहाय अन्नधान्य वितरित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, या निर्देशाचे पालन करीत जिल्ह्यातील एकही गरजू अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगडवासियांना आश्वस्त केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ माहे एप्रिल, मे व जून 2020 महिन्यात दरमहा त्या-त्या महिन्यात, त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठीही शासनाने प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य माहे मे व जून 2020 या दोन महिन्यांसाठी दरमहा त्या त्या महिन्यात वितरण करण्यात येईल,असेही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
रायगड जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांसाठी दरमहा वितरित करावयाच्या शिधा जिन्नसाची माहिती पुढीलप्रमाणे आहे- पिवळी शिधापत्रिका (अंत्योदय शिक्का) व केशरी शिधापत्रिका (प्राधान्य कुटूंब शिक्का) असलेल्या पात्र लाभार्थ्यांना माहे एप्रिल, मे व जून 2020 साठी अन्नधान्य- अंत्योदय लाभार्थी (नियमित),तांदूळ-25किलो प्रति कार्ड,गहू-10किलो प्रति कार्ड, दर (प्रति किलो), तांदूळ-3/- रु., गहू-2 रु. प्राधान्य लाभार्थी (नियमित), तांदूळ- 3 किलो प्रति व्यक्ती, गहू-2 किलो प्रति व्यक्ती, तांदूळ- 3/- रु., गहू-2 रु. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य लाभार्थीसाठी मोफत अन्नधान्य (तांदूळ), 5 किलो प्रति व्यक्ती-मोफत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरमहा प्रति शिधापत्रिका 1 किलो साखर शासन अनुदानित दर रु.20/- प्रति किलो दराने नियमित वितरित करण्यात येते.
एपीएल केशरी लाभार्थ्यांना माहे मे व जून 2020 साठी – एपीएल केशरी लाभार्थी, तांदूळ-2 किलो प्रति व्यक्ती, गहू-3 किलो प्रति व्यक्ती, तांदूळ-12/- रु., गहू-8 रु.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेमध्ये अन्नधान्य घेण्यासाठी पात्र असलेल्या शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय पिवळी व प्राधान्य केशरी कुटूंबातील शिधापत्रिका देण्यात आलेली आहे. शासन परिमाण दरानुसार शिधापत्रिकाधारकांना शिधा जिन्नस वितरीत करण्यात येणार आहे.तसेचएपीएल,केशरी शिधापत्रिकाधारकांनाही शासन परिमाण दरानुसार शिधा जिन्नस वितरीत करण्यात येणार आहे.
कोणताही पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, याबाबतची दक्षता घेण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
करोना विषाणूच्या लॉकडाऊनमुळे उद्योग बंद झाल्याने प्रभावित झालेले कामगार, परराज्यातील कामगार, बेघर व्यक्ती यांच्यासाठी OMSS योजनेतून गहू व तांदूळ जिल्हा प्रशासनाने खरेदी केला आहे. संबंधित तालुक्यांच्या मागणी नुसार तो तालुक्यांना उपलब्ध करुन दिला जात आहे. अद्यापपर्यंत OMSS योजनेअंतर्गत गहू -50 मे.टन व तांदूळ – 100 मे. टन खरेदी करुन पनवेल, उरण, माणगाव, महाड व पोलादपूर या पाच तालुक्यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उर्वरित गहू -75 मे.टन व तांदूळ – 150 मे. टनाची मागणी FCI पनवेल यांच्याकडे नोंदविण्यात आली होती, त्याची उचल प्रशासनाने केली असून उपलब्ध झालेले गहू व तांदूळ दहा तालुक्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी असा निर्णय घेतला आहे की,जे लोक मुंबई-पुण्याहून रायगडमधील आपआपल्या गावी परतले आहेत, मात्र ते त्यांचे रेशनकार्ड मुंबईतच विसरले आहेत, त्यांनाही जरी रेशनकार्ड नसले तरी अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाईल. त्याचबरोबर सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोरपणे पालन करुन (2 व्यक्तीमध्ये कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेऊन उभे राहावे. पात्र असलेल्या योजनेचे शासन अनुदानित अन्नधान्य शासनमान्य दराने प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना केले आहे.