दवाखाने, औषधी दुकाने चोवीस तास सुरू

यवतमाळ : गत काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 14 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझेटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने यवतमाळ शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यवतमाळ शहर 24 एप्रिलच्या दुपारी 12 वाजतापासून 27 एप्रिल 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे.

गुरुवारी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वरील बंदच्या काळात यवतमाळ शहरातील दवाखाने, औषधी दुकाने पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांची औषधी दुकाने 24 बाय 7 सुरू राहील. तसेच दुधाची दुकाने सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. पशुखाद्याची दुकाने सकाळी 6 ते 9 या वेळात, पेट्रोलपंप सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेकरीता पेट्रोलपंप 24 बाय 7 सुरू राहतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाणे व येण्याकरीता मुभा राहील. सदर आदेश फक्त यवतमाळ शहराकरीता लागू राहतील.यवतमाळ जिल्ह्यातील इतर शहरी ग्रामीण भागाला हे आदेश लागू राहणार नाही. त्या ठिकाणच्या मुभा देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा याआधी ठरवून दिलेल्या वेळेनुसारच सुरू राहतील. वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 च इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.