मुंबई : मुंबई शहरातील खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना देण्याचे निर्देश पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते, त्यानुसार महापालिकेने खाजगी रुग्णालयासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या आहेत.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. शेख यांनी दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.
खासगी रुग्णालयासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.
1) रुग्णालयात काम करणाऱ्या व प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णांना हाताळणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगारांना पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर आवश्यक साधने उपलब्ध करुन द्यावीत.
2) रुग्णालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना पुरेशी विश्रांती मिळेल याची दक्षता घेण्यात यावी.
3) रुग्णालयात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना त्यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करावे.
4) रुग्णालयांत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना कर्तव्यावर उपस्थित होण्याकरिता वाहतुकीची पुरेशी साधने उपलब्ध नसल्यास त्यांच्याकरिता वाहतुकीची व्यवस्था करणे.
कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या व रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक यांना संसर्ग होऊ नये व त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी वरील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे.