नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनची झळ शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित कामगारांना बसू नये, यासाठी केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रासाठी आणखी सवलती मंजूर केल्या आहेत.
यानुसार, शेतमालाच्या वाहतुकीच्या दृष्टीनं महामार्गावरील ट्रक-दुरुस्तीची दुकानं, तसंच शेतकी अवजारांची आणि यंत्रांची दुकानं, त्यांचे सुटे भाग आणि दुरुस्तीची कामं उघडी ठेवता येऊ शकतील. त्याशिवाय, चहा उद्योग आणि मळे यांना जास्तीत जास्त ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा असेल.
सामाजिक ठिकाणी व्यक्ती-व्यक्तींतील सुयोग्य अंतर राखण्यासंबंधी तसंच स्वच्छतेसंबंधीची खबरदारी, संबंधित संस्थेच्या प्रामुख्यानं घ्यायची आहे, असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं असून, या निर्देशांचं काटेकोर पालन व्हावं, याची खबरदारी जिल्हा प्राधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.