नवी दिल्ली : मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला, यवतमाळ जिल्ह्यात आर्णी इथं कोळवन गावाजवळ, भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२ मजूर जखमी झाले आहेत.

हा अपघात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास  झाला. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम करणाऱ्या, रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपर वर, मागून आलेली एसटी बस धडकली. ही एसटी सोलापूरहून मजुरांना घेऊन, झारखंडच्या दिशेनं जात होती.

टाळेबंदीमध्ये सोलापूर इथं अडकलेल्या ३० कामगारांना बिहारला घेऊन निघालेल्या खासगी बसचा काल रात्री नांदेड जिल्ह्यात अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी कामगार ठार, तर २८ जण जखमी झाले आहेत. लोहा तालुक्यात खेडकरवाडी या गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सर्व जखमींना नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

नागपूर – सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातल्या मुकटी गावाजवळ काल सायंकाळी भीषण अपघात झाला. त्यात ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. खासगी ट्रॅव्हल्स आणि गॅस टँकरच्या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा अपघात झाला होता.