अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
मुंबई : अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून एप्रिल महिन्याचे अन्नधान्याचे वितरण सुरळीत पार पडले तसेच मे व जून महिन्याचे अन्नधान्य वितरण सुरळीत पार पाडावे, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.
मंत्रालयात आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री.भुजबळ बोलत होते.
या बैठकीत माहे मे व जून महिन्याच्या अन्नधान्य वितरणाचा आढावा, रेशनकार्ड नसलेल्या गरीबांसाठी धान्य वितरण करण्याबाबत केंद्र शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करणे, स्वस्त धान्य दुकानांसाठी विमा कवच, हमाल व वाहतूक कंत्राटदार यांना वेळेवर अनुदान उपलब्ध होणे, अन्न धान्य विकत घेण्यासाठी प्रलंबित अनुदान, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे खाद्यतेल, भरडधान्य इ. वितरण करण्यासाठी नवीन योजना तयार करणे, तुरडाळ-चनाडाळ नियतन, उचल व वितरण तसेच शिवभोजन उद्दिष्ट या विषयांवर चर्चा झाली व विविध उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला.
कोव्हीड १९ उपाययोजनांच्या नियमांचे पालन करुन सोशल डिस्टन्सिंग राखत सचिव आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर आढावा बैठक पार पडली. बैठकीस अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंदारे, मुंबई नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा संचालक श्री.कैलास पगारे, सहसचिव सतिष सुपे, चारुशीला तांबेकर हे उपस्थित होते.