पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली
पुणे : राज्यातील सर्व शासकीय विभागातील मोठया प्रमाणावर असणारी रिक्त पदे भरण्याबाबत शासन धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या अखत्यारितील तलाठी संवर्गातील रिक्तपदे भरण्याची प्रक्रीया महा-आयटीच्या माध्यमातून ई-महा परीक्षा या पोर्टलवरून दि. २ जुलै ते २६ जुलै 2019 या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, सदर परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होत आहे.उमेदवारांना पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभूत सोयी असणा-या शाळा कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात येऊन राज्यभरात एकूण 122 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्ती, मतदान ओळखपत्र, मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबुक व आधार कार्ड, ओळखपत्र फेरफार करून तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स, ई-आधार कार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध ओळखपत्र पुरावा म्हणून स्विकारली जाणार नाही.
महापरीक्षा पोर्टलवरून घेतल्या जाणा-या परीक्षा चालू असताना नियमांचे पालन केले जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरीक्षक म्हणून महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परीक्षा नियंत्रक म्हणून प्रत्येकी एका अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी किंवा तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 3000 7766 व enquiry@mahapariksha.gov.in या मेलवर संपर्क साधण्यात यावा असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.