कोविड-19 संदर्भात जनजागृती करण्याबरोबरच सीमेवर घुसखोरी रोखण्याचे गृहमंत्र्यांचे सीमा सुरक्षा दलाला निर्देश
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचे मुख्यालय आणि त्याच्या विभागीय मुख्यालयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून भारत – पाकिस्तान आणि भारत – बांगलादेश सीमेवरील सुरक्षा सज्जतेचा आढावा घेतला.
सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी सीमावर्ती जागांवर विशेषत: तटबंदी नसलेल्या ठिकाणी सुरक्षा वाढविण्याचे निर्देश शहा यांनी दिले.
सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना कोविड-19 संदर्भात शिक्षण दिले पाहिजे आणि या भागात त्याचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे. तसेच, जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने बीएसएफने हे सुनिश्चित केले पाहिजे की लोक अनवधानाने सीमारेषा ओलांडून जाणार नाहीत असेही शहा यांनी सांगितले.
कोविड-19 महामारीच्या काळात बीएसएफने केलेल्या उत्तम कामगिरीचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले. लॉकडाऊन दरम्यान, बीएसएफ संघटनांनी त्यांची उर्जा खालील गोष्टींवर केंद्रित केली आहे.
- आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागरुकता अभियान
- खेड्यात जिथे जिथे शक्य असेल तिथे स्वच्छताविषयक प्रयत्न,
- चेहऱ्याला लावायचे मास्क आणि हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे.
- दुर्गम खेड्यांसह गरजू लोक, स्थलांतरित कामगार, रोजंदारीवर काम करणारे आणि सीमावर्ती भागात अडकलेले ट्रक चालक यांना रेशन, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरविणे,
या आढावा बैठकीत केंद्रीय गृह सचिव , सचिव (सीमा व्यवस्थापन) आणि बीएसएफच्या महासंचालकांसह केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि नित्यानंद राय उपस्थित होते.