नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड19 मुळे आणखी 35 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 308 झाली आहे. यातले 22 रुग्ण महाराष्ट्रातले होते. राज्यात आतापर्यंत 149 जण या आजारानं मरण पावले आहेत. त्याखालोखाल मध्य प्रदेशात 36 तर गुजरातमधे 25 रुग्ण मरण पावले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे की देशात एकूण 9 हजार 152 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळलं असून त्यातले 72 परदेशी नागरिक आहेत. देशात आतापर्यंत 856 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
राज्यात आज सकाळपर्यंत कोरोना संसर्ग झालेले आणखी 82 रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 हजार 64 झाल्याचं राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं सांगितलं. यातले ५९ रुग्ण मुंबईत तर ५ रुग्ण नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात आढळले. ठाणे जिल्ह्यात 5, पुण्यात 3 तर पालघर जिल्ह्यात 3 रुग्ण आढळले.
सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथले २४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. काल या रुग्णांची दुसरीही निगेटिव्ह आली.
मुंबईतल्या एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या, सांगलीच्या रेठरे धरण परिसरातल्या २५ जणांना, मिरज इथल्या विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांची चाचणी केली जाणार असल्याची माहिती सांगलीचे जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.संजय साळुंखे यांनी दिली आहे.
अमरावती जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांचं खासगी रुग्णालय कल्याण-डोबिंवली महापालिकेच्या ताब्यात दिलं आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी त्यांनी हे रुग्णालय उपलब्ध करुन दिलं आहे. या रुग्णालयात १५ ते २० व्हेंटिलेटर तसंच १०० खाटा आहेत.