पुणे : कोणताही नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास विविध संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तिंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यामध्ये पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे हे संस्थापक अध्यक्ष असलेली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (डिक्की) ही संस्था देखील आघाडीवर आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन देशभर लागू केला. तथापि, राज्य शासनाने त्यापूर्वीच दोन-तीन दिवस अगोदर शाळा, महाविद्यालये, मॉल, थियटर बंद केली, त्यामुळे लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील बेघर, हातावर पोट असणारे नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रशासनातील अधिका-यांनी उपाय योजण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तिंना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहका-यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांच्या आवाहनानुसार पुणे शहरातील 7 निवारागृहातील बेघर नागरिकांच्या सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. जिल्हा प्रशासनाकडून भोजन वितरणाची पहिली परवानगी डीक्कीला मिळाली, हे विशेष!
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंपाकगृहात सुमारे 2100 लोकांच्या जेवणाची तयारी गेल्या 28 मार्चपासून करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर गायकवाड व त्यांच्या अधिका-यांच्या मदतीने हे तयार भोजन आणि नाष्टा वितरीत करण्यात येत आहे.
येरवड्यातील मदर तेरेसा समाज मंदिर, क्रांतीवीर लहूजी वस्ताद शाळा, साळवे इ लर्निंग स्कूल, तसेच नानासाहेब परुळेकर स्कूल (विश्रांतवाडी) आणि वडगाव शेरीतील आचार्य आनंदऋषी शाळा, लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय येथे नाष्टा आणि दोन वेळचे भोजन वितरित केले जाते. या कामी डिक्कीतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचा 40 जणांचा गट सहकार्य करत आहे. त्यामध्ये राजेश बाहेती, अनिल ओव्हाळे, राजू साळवे, अमित अवचरे, महेश राठी, कौस्तुभ ओव्हाळे, राजू वाघमारे, मैत्रयी कांबळे आणि सीमा कांबळे यांचा प्रमुख सहभाग आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीचे औचित्य साधून 2100 खास स्वीट डिशेस देण्यात आल्याचे डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितले. याशिवाय 129 वस्त्यांतील 1129 कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाला, मीठ, दाळ यांचा समावेश असलेला शिधा (4 माणसांच्या कुटुंबाला आठ दिवस पुरेल इतका) वितरित करण्यात येणार आहे.
डिक्की ही संघटना 14 एप्रिल 2005 रोजी स्थापना करण्यात आली. प्रत्येक राज्यात तिच्या शाखा आहेत. याशिवाय 7 देशातही ही संघटना पोहोचली आहे. सुमारे एक लाखांहून अधिक उद्योजक या संघटनेचे सदस्य आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून बेघर व्यक्तींच्या दोन वेळच्या भोजनाची जबाबदारी आम्ही उचलली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर ससूनमधील कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टर आणि इतर कर्मचा-यांची राहण्याची व्यवस्था बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहात करण्यात आली होती. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची सोय जुन्या शासकीय विश्रामगृहात (आय बी) करण्यात आली आहे. येथे सुमारे 40 जण राहत आहेत. यांच्याही भोजनाची जबाबदारी डीक्कीने उचलली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील पोलीस कर्मचारी व इतरांच्याही भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.