नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासात कोरोना बाधित एक हजार ७६ नव्या रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ हजार ४३९ झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं. गेल्या २४ तासात कोरोना बाधित ३८ जणांचा मृत्यू झाला असून देशात आता कोरोनानं मरण पावलेल्यांची संख्या आता ३७७ झाली आहे.
मुंबईत गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 18 झाली आहे.  राज्यात 350 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 684 झाली आहे. यात एकट्या मुंबईत 1 हजार 756 रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात 178 रुग्ण दगावले आहेत यात मुंबईतल्या दगावलेल्याची संख्या 112 आहे. राज्यात  259  तर मुंबईत 164 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात  सात नवीन रुग्ण आढळल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. ठाण्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आधीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांसह 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतांनाच त्यात परांजपे यांचाही समावेश झाला आहे.  त्यामुळं जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  251 झाली आहे. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
मीरा भाईंदर मध्येही मंगळवारी दोन रुग्णांची नोंद झाल्यामुळं तिथं कोरोना बाधीतांची संख्या 49 वर पोहोचली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज कोरोनाच्या २ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यात एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण ५८ रुग्णांची नोंद झाली असून यापैकी २ जणांचा मृत्यू झाला.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मधुमेह, उच्च रक्तदाब, खोकला या आजाराने ग्रस्त ४५ वर्षीय रुग्णाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला होता. त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती हे आज समोर आलं आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं विलगीकरण कक्षात ठेवलेल्या अन्य राज्यातल्या 21 मजुरांनी काल रात्री पलायन केलं असून  त्यांच्या विरोधात  कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७ झाली आहे. शाहुवाडीतल्या २४ वर्षाच्या तरुणाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.