नागपूर येथे झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे नोंदणीकृत पट्टे वितरणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

नागपूर : झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महसूल, नागपूर सुधार प्रन्यास, तसेच महानगरपालिका यांनी कालबध्द कार्यक्रम तयार करुन पात्र लाभार्थ्यांना मालकीहक्काचे नोंदणी झालेले पट्टे वाटप करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

रामगिरी येथे नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे नोंदणीकृत पट्टे वितरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. त्याप्रसंगी पट्टे वाटपाच्या कार्यक्रमाला प्राधान्य देवून कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

मालकीहक्काचे पट्टे वाटपासंदर्भात शंभर झोपडपट्या महसूल विभागाच्या जागेवर आहे. त्यापैकी 52 झोपडपट्यांमध्ये मालकीहक्काने राहणारे पट्टेधारकांची माहिती पूर्ण झाली आहे. तसेच पट्टे वाटपासाठी शहराच्या विविध भागातून सुमारे चार हजार सातशे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी तीन हजार नऊशे लाभार्थी पात्र ठरले असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावी, तसेच त्यांना नोंदणी झालेले पट्टे वितरित करण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महानगर पालिकेच्या जागेवर 13 झोपडपट्या असून त्यापैकी 13 झोपडपट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. खाजगी जागेवर असलेल्या झोपडपट्या संदर्भात शासनस्तरावर धोरण ठरविण्यात येत असून संबंधित खाजगी जागा मालकांना टीडीआर देवून पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भातही प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शासकीय जागा, महानगर पालिका व सुधार प्रन्यास आदी जागेवर बसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही करताना यासंदर्भात महानगर पालिकेला जागेची मालकी देवून येथील पट्टे वाटप महानगर पालिकेने पट्टे वाटप पूर्ण करावे यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेन सादर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

पट्टेधारकांना मालकीहक्काचे पट्टे वितरीत करताना प्रत्येक नागरिकांना नोंदणी करुन पट्टे वितरीत करण्यासाठी नोंदणी विभागातर्फे वेगळी व्यवस्था करण्यात आली असून या कामाला अधिक गती देण्यात येईल. मालकीहक्काचे पट्टे वाटपासंदर्भात ज्या पट्टेधारकांना पट्टे वाटपाची डिमांड मिळाली आहे. अशा नागरिकांनी तात्काळी डिमांड भरुन भूखंडाची मालकी आपल्या नावाने करुन घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. विकासनगर, मोठा इंदोरा, शीव नगर, चुन्नाभट्टी आदी वस्त्याचे मालकीहक्काचे पट्टे वाटपाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वितरणाच्या कामासंदर्भात महानगर पालिका आयुक्त यांनी महसूल व सुधार प्रन्यास आदी विभागाचा समन्वयाचे काम करावे. तसेच पट्टे वाटपासंदर्भात येत्या 15 दिवसानंतर आढावा घेवून पट्टे वाटपाची माहिती सादर करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. बैठकीस महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर, नगरसेवक संजय बंगाले, सेंटर फार सस्टेनेबल डेव्हल्पमेंट या संस्थेच्या प्रमुख श्रीमती लिना बुधे आदी उपस्थित होते.