आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांची  तत्परता

नाशिक : मधुमेह म्हणजे आयुष्यालाच जडलेली व्याधी. औषधांची, डॉक्टरांची गरज कधी भासेल सांगता येत नाही. या रुग्णांसाठी औषधे ही ‘संजीवनी’पेक्षा कमी नसतात. दिपाली नगर (मुंबई नाका) येथील राहणाऱ्या एका नागरिकाची मधुमेहाची औषधे सकाळी संपली. घरात ते आणि त्यांची मुलगी दोघेच. बाहेर संचारबंदी असल्याने कसं बाहेर जायचं, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र त्यांच्या मदतीला नाशिकचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि नाशिकचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार धावून आले. संबंधित रुग्णाने फोन केल्यानंतर त्यांना अवघ्या तासाभरात मधुमेहाची औषधी घरपोच मिळाली. दारात औषधे घेऊन आलेले ‘देवदूत’ पाहताच संबंधित रुग्णाचे हात आपसूकच जोडले गेले.

मुंबई नाका येथील दिपाली नगरात संजय गोसावी, वय 49 वर्षे हे आपल्या मुलीसोबत राहतात. श्री. गोसावी हे मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांना दररोज काही औषधी घ्यावी लागतात. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये श्री. गोसावी अडकले. आपल्याला आधीच व्याधी असल्यामुळे कशाला बाहेर पडायचे त्यामुळे त्यांनी स्वत:ला घरात क्वारंनटाइन केलेले होते. मात्र आज गुरुवार 16 एपिल रोजी त्यांची मधुमेहाची औषधी संपली. घरात औषधे नाहीत आणि बाहेर कोरोनाचे संकट अशा संकटात श्री गोसावी अडकलेले असताना त्यांना एक आशेचा किरण दिसला. नाशिक जिल्हा आपत्ती निवारण कक्ष. श्री. गोसावी यांनी लागलीच आपत्ती निवारण कक्षाला फोन करून आपली अडचण सांगितली. तेथील अधिकाऱ्यांनी लगेच डॉ. अनंत पवार यांचा फोन नंबर त्यांना दिला. गोसावी यांनी डॉ. पवार यांनी आपली अडचण आणि औषधांबाबत माहिती दिली.

डॉ. पवार गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्ण तपासणी आणि इतर संबंधित कामांमध्ये पूर्ण व्यस्त आहेत. मात्र त्यांना श्री. गोसावी यांच्या व्याधीबाबत समजताच त्यांनी लगेचच तपासणी पेपर तयार करून आपल्या यंत्रणेद्वारे अवघ्या तासाभरात श्री. गोसावी यांना घरपोच औषधे पुरविली. फोन केल्यापासून बेचैन असलेल्या गोसावी यांच्या दारात शासकीय वाहन थांबताच त्यांचा जीव भांड्यात पडला.

संचारबंदी, लॉकडाऊन, कोरोनाचे वाढते रुग्ण आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेवर वाढता ताण या सगळ्या अडचणींतूनही मार्ग काढत डॉ. अनंत पवार यांनी मधुमेही रुग्णाला अवघ्या तासाभरात औषधी उपलब्ध करून दिल्याने नाशिकच्या आरोग्य व्यवस्थेविषयी आणि स्टाफविषयी ‘सर्वसामान्य नाशिककर’ असलेल्या श्री. गोसावी यांनी आभार व्यक्त केले.