मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत चेन्नई येथे भव्य ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचा समृद्ध पर्यटन वारसा तिथे सादर करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्रातील विविध कलाप्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे सादरीकरण करुन या रोड शोच्या माध्यमातून तेथील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
रोड शोला पर्यटन संचालक दिलीप गावडे, सहायक संचालक सुशील पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटनावर आधारित सादरीकरण, बी टू बी चर्चासत्रे व प्रश्नोत्तरे तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. पर्यटकांनी महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. पर्यटनाशी निगडीत व्यावसायिक, सहल आयोजक व नामांकित ट्रॅव्हल एजन्ट यांच्यासमवेत चर्चा करुन त्यांना महाराष्ट्रातील पर्यटनसंधींची माहिती देण्यात आली.
तामिळनाडूतील पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे तेथील पर्यटन व्यावसायिक आदींशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यात कला, संस्कृती, साहित्य इ. बाबतीत समृद्ध वारसा आहे. तामिळ आणि मराठी या दोन्ही भाषा श्रेष्ठ असून वर्षानुवर्षांपासून अस्तित्वात आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे या दोन राज्यांमधील संबंधांना आणखी वृद्धिंगत करायचे आहे. महाराष्ट्रात कला, संस्कृती, पर्यटन अशा विविध क्षेत्रात फार मोठे वैविध्य असून हे पाहण्यासाठी तामिळनाडूतील पर्यटकांनी महाराष्ट्रात यावे, महाराष्ट्र आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
देशात महाराष्ट्र पर्यटनाला प्रतिसाद
या उपक्रमाविषयी माहिती देताना पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले, महाराष्ट्राला प्राचीन, सांस्कृतिक आणि नैसर्गिक असा फार मोठा वारसा लाभलेला आहे. राज्यात समुद्र किनारे, किल्ले, लेण्या, गुंफा, जंगले अशी बरीच पर्यटनस्थळे आहेत. या सर्व पर्यटनस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांना व्हावी व त्यांनी या स्थळांना भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे देशांतर्गत रोड शोचे आयोजन केले. कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या रोडशोला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर चेन्नई येथे रोडशो आयोजित केला असून यानंतर मदुराई येथेही रोडशो होणार आहे. चेन्नई येथील कार्यक्रमात पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट देण्यासाठी मोठा रस दाखवला, असे त्यांनी सांगितले.
देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटकांना, सहल आयोजकांना व पर्यटन व्यवसायिकांना राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणे, पर्यटनाशी निगडीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, पारंपरिक कला- संस्कृती, हस्तकला, पाककृती आदींची ओळख करून देणे व त्यांच्याशी व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करून विविध राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करणे हा ‘रोड शो’ चा मुख्य उद्देश आहे, असे पर्यटन संचालक श्री. दिलीप गावडे यांनी सांगितले.