नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, देशभरात सुरु असलेल्या संचारबंदीला, १४ एप्रिलनंतरही मुदतवाढ द्यावी, असं मत देशातल्या बहुतांश राज्यांनी व्यक्त केलं आहे. तशी विनंतीही या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत केली. केंद्र सरकार या विनंतीवर सकारात्मक विचार करत असल्याचं अनेक मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर सांगितलं.
या काळात लोकांच्या सुरक्षिततेवर लक्ष देण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यावर आपण भर द्यायला हवा, असंही त्यांनी बैठकीत सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाची आणि उपाययोजनांची माहिती या बैठकीदरम्यान मोदी यांना दिली.