नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या प्रस्तावानंतरच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी घेतला; या निर्णयामुळे तृणधान्याचं उत्पादन घेणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून तृण धान्यांची वाढती मागणी छोट्या शेतकऱ्यांना बळ देणारी आहे; असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशावासियांशी संवाद साधला. कृषी उत्पादक कंपन्या आणि उद्योजकांनी ही धान्यं बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असं सांगताना महाराष्ट्रात अलिबागजवळच्या केनाड गावात राहणाऱ्या शर्मिला ओसवाल यांचा उल्लेख त्यांनी केला.

देशाच्या विविध शहरांत जी-20 परिषदेच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या भोजनात तृणधान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा समावेश केला जात आहे, असं मोदी यांनी सांगितलं. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये आदिवासी समाजाला आणि आदिवासी जीवनाशी निगडित लोकांना चांगलं प्रतिनिधित्व मिळालं आहे, असं ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी गडचिरोलीच्या प्रसिद्ध झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित परशुराम खुणे यांचाही आवर्जून उल्लेख केला. पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा, असं आवाहन त्यांनी केलं.

नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भात बोलताना प्रधानमंत्र्यांनी India-The Mother of Democracy या पुस्तकाचा उल्लेख केला. भारतीय समाज स्वभावतःच लोकशाहीवादी आहे; देशाच्या प्रत्येक भागात शतकानुशतकं लोकशाहीची भावना कशा प्रकारे प्रवाहित होत आहे, ते या पुस्तकातून जाणवेल, असं ते म्हणाले.

गोव्यात पणजीमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला दिव्यांगजनांसाठी झालेल्या ‘पर्पल फेस्ट’ कार्यक्रमाबाबतही मोदी यांनी काल मन की बातमधून माहिती दिली. दिव्यांगांच्या कल्याणासाठी केला गेलेला हा एक अनोखा प्रयत्न होता; त्यात जवळपास 50 हजारांहून अधिक दिव्यांगांनी सहभाग घेतल्याच त्यांनी सांगितलं. मन की बात च्या कालच्या 97 व्या भागात मोदी यांनी ई कचरा या विषयावर विस्तारानं मांडणी केली. आजची नवीन आणि अत्याधुनिक उपकरणं ही भविष्यातील ई-कचरा आहेत. त्यामुळे नवीन उपकरण खरेदी करताना आधीच्या उपकरणाची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी सांगितलं.

ई कचरा संकलनाचं काम करणाऱ्या पुण्यातल्या स्वच्छ या संस्थेचे अमोघ उंगले या विषयावर बोलताना म्हणाले,नागरिकांकडचा ई कचरा म्हणजे जुने मोबाईल फोन असतील, चार्जर असतील, बंद पडलेले टेप रेकॉर्डर असतील, ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात याच्यात विविध धातू असतात. हे जर योग्य पद्धतीने हाताळले गेलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे ई-कचरा योग्य पद्धतीने हाताळणं आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली जाणं. या ई कचऱ्यातून होणारं रिसायकलिंग चे प्रमाणही त्यामुळे वाढू शकतं. त्यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन त्यांच्याकडचा ई कचरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू पुण्यामध्ये शहरातल्या वेगवेगळ्या भागात दर शनिवार रविवारी ई वेस्टचं कलेक्शन केलं जातं, तिथे जर नागरिकांनी ते आणून दिलं तर तो योग्य मार्गाने एमपीसीबी ऑथराईज्ड रिसायकलर थ्रू रिसायकलिंग साठी जाईल.