मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगरातील साकीनाका व काळबादेवी परिसरातील १७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

चांदिवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या समोर रस्त्यावर, साकीनाका, याठिकाणी एका इसमास 06 X 1000 मि.ली ब्लॅक लेबल बनावट मद्याची वाहतूक करीत असताना अटक करण्यात आली. तपासात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे एच.डी.05, शर्मा कंम्पाऊंड सिद्धीविनायक सोसायटीच्यासमोर मोहली व्हीलेज लक्ष्मीनारायण मंदिर रोड साकीनाका या ठिकाणी छापा टाकून 71 X 1000 मि.ली. बनावट विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या तयार बाटल्या, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, बनावट बुचे, मोनो कार्टुन विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या, पॅकींगसाहित्य, फनेल, टोचा, ड्रायर मशीन इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या.

या ठिकाणी उपस्थित राहुल प्रल्हाद परमार, वय 24 वर्षे व या इसमास मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ), (ब), (क), (ड), (ई) 81, 83, 108 अन्वये अटक करण्यात आलेली असून या गुन्ह्यातील एकूण मुद्देमालाची किंमत 12 लाख 67 हजार 870 एवढी आहे.

तसेच दुसऱ्या कारवाई अंतर्गत सांताक्रुझ (पू.) येथून पाठलाग करुन ओम साई कार्गो फॉरवर्डस मल्हारराव वाडी, दारीसेठ अग्यारी लेन काळबादेवी रोड, येथे रमनिकलाल भुरालाल शाह, वय 56 वर्षे, यास 6 X 1000 मि.ली. ब्लॅक लेबल विदेशी मद्य व ब्लॅक लेबल विदेशी मद्य ब्रॅण्डचे 1000 बनावट बुचे (कॅपसह) मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(ई), (अ) 108 अन्वये अटक करुन रुपये 4 लाख 61 हजार 500 एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपरोक्त दोन्ही कारवाईत मिळून एकूण अंदाजे किंमत रु. 17 लाख 29 हजार 370 एवढ्या किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.