मुंबई :  माहिती तंत्रज्ञान, वाहन, पायाभूत सुविधा, कला-संस्कृतीसह पर्यावरण क्षेत्रात एकत्रित काम करण्यासाठी जर्मनीतील बॅडन- -ह्युटनबर्ग तसेच महाराष्ट्र शासन यांच्यात सह्याद्री आतिथीगृह येथे सामंजस्य करार झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई तर जर्मनीच्या वतीने बॅडन-ह्युटनबर्गच्या मंत्री थेरेसा शॉपर उपस्थित होत्या.

बॅडन आणि महाराष्ट्र शासन यांच्यात 2015 मध्ये विविध बाबींवर सामंजस्य करार करण्यात आला होता. त्याला पाच वर्षे पूर्ण झाले असून येत्या काळात दोन्ही राज्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. नव्या सामंजस्य करारानुसार दोन्ही राज्य नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशन या क्षेत्रात परस्पर सहकार्य करणार आहेत. याशिवाय विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात काम करण्याचा दोन्ही राज्यांनी निर्धार केला आहे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा निर्धार उभयंतांनी व्यक्त केला आहे.

जर्मनी आणि महाराष्ट्राची मैत्री जुनी आहे. ती यापुढेही कायम राहील. जर्मनीतील उद्योगांना महाराष्ट्र शासन सर्व मदत करण्यास तयार असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.