????????????????????????????????????

पिंपरी : महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे तशी पिंपरी चिंचवड नगरी देखील संत आणि थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. अशा नगरीमध्ये आज जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे उद्घाटन करताना अतिशय आनंद होत आहे अशी भावना महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केल्या.

महानगरपालिकेच्या वतीने टाळगाव चिखली येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे ऑनलाईन उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उद्घाटनाच्या वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, संतपीठाच्या संचालिका स्वाती मुळे उपस्थित होते तर ऑनलाईन उपस्थिती आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर हिराबाई घुले, आयुक्त राजेश पाटील विविध समित्यांचे सभापती, गटनेते प्रभाग अध्यक्ष, नगरसदस्य, नगरसदस्या आणि अधिकारी यांची होती.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी संतपीठाची स्थापना शालेय विद्यार्थ्यांना संतवाड़मय अभ्यासाकरीता झाली असल्याचे सांगितले याकरीता २०२१-२०२२ या वर्षाकरीता नर्सरी, ज्युनियर, सिनियर केजी या वर्षाकरीता प्रत्येकी ४० प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगितले.

उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी अभंगाच्या तालावर पालखी सोहळा सादर केला. रिंगण, फुगड्या, पाउल्या आदी खेळ खेळण्यात विद्यार्थी दंग झाले होते. युवा किर्तनकार ह.भ.प. सदानंद महाराज, खंडू महाराज मोरे यांनी सुश्राव्य किर्तन सादर केले. सारंग कुंभार इयत्ता ४ थी यांनी संत ज्ञानेश्वर आणि श्रीधर तापकीर यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका सादर केली. तर संतपीठाचे लिपिक अविनाश तळपे यांनी पांडुरंगाची, शिक्षिका स्नेहल पगार यांनी जनाबाईची भूमिका सादर केली.

या कार्यक्रमाकरीता, मुख्याध्यापक गौतम इंगळे, प्राध्यापक ज्ञानेश्वर घाडगे, राजाभाऊ महाराज ढोरे, शिवाजी घाडगे यांची तसेच फिरोजभाई शेख, यशवंत लिमये, संभाजी बालघरे, गोरख मोरे, दत्ता परे आदींचे सहकार्य लाभले.