मुंबई : महाराष्ट्रातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील कार्यालये, बँका, रेल्वे तसेच टपाल कार्यालयात त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा सक्तीने वापर करावा, अशी मागणी करणारे पत्र मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले आहे.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 नुसार मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे. केंद्र शासनाने राजभाषा नियम 1976 चे धोरण अंगिकारलेले असून त्याद्वारे राज्याच्या अखत्यारितील सर्व कार्यालयांना त्रि-भाषा सूत्र लागू केलेले आहे. परंतु केंद्र सरकारची प्राधिकरणे त्रि-भाषा सूत्राचे पालन करत नाहीत. त्रि-भाषा सूत्रामध्ये दंडाची किंवा शिस्तभंगाच्या कारवाईची कोणतीही तरतूद नसल्यामुळे हे घडत असून संबंधित विभागांना तात्काळ आदेश देऊन मराठी भाषा वापरण्याबाबत सूचित करावे, असे पत्र श्री. देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले आहे.

केंद्र शासनाच्या अनेक कार्यालये, राष्ट्रीयकृत बँका, पश्चिम व मध्य रेल्वे यामध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या अनेक तक्रारी शासनास प्राप्त झालेल्या आहेत. याबाबत संबंधित कार्यालयांना वारंवार सूचना देऊन त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.