नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. उद्योगजगतातील नेतृत्व, बँकिंग क्षेत्रातले प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत आज मुंबईत झालेल्या परिषदेत त्या बोलत होत्या.
सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यावर केंद्रसरकारचा भर आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २२ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. करांचं अधिक सुलभीकरण करण्याकडे सरकार लक्ष देत आहे. कंपनी कायद्यासह विविध कायद्यात सुधारणा करुन आर्थिक गैरव्यवहारांना चाप लावला जात आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेल्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. प्राप्तीकराबाबत पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली आहे, त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सरकारचं लक्ष आहे, असंही त्या म्हणाल्या.