नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत आहेत, त्यामुळे कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं वक्तव्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संविधान दिनानिमित्त गुजरात इथं आयोजित पिठासीन अधिकाऱ्यांच्या सम्मेलनात केलं.
गेले काही वर्ष अधिकारांच्या मर्यादेचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न झाला, पण संविधानात असलेल्या तरतुदींमुळे ते शक्य होऊ शकलं नाही. काही जुने कायदे बदलणं गरजेचं आहे. प्रत्येक नागरिकांनं व्यापक स्वरुपात संविधान समजून घेणं गरजेचं आहे. कारण संविधानाची सुरक्षा सामान्य नागरिकांवर अवलंबून आहे.
प्रत्येक नागरिकांचा सम्मान वाढावा हाच आपल्या संविधानाचा मूळ गाभा आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या संविधानात प्राधान्य दिलं आहे. आपलं संविधान कालातीत आहे, असं त्यांनी सांगितलं.
एक देश एक निवडणूक काळाची गरज आहे, त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असंही ते म्हणाले. 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा मोदी यांनी निषेध केला आणि या हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनांना त्यांनी आदरांजली वाहिली. हा हल्ला देश कधीच विसरू शकत नाही, असंही ते म्हणाले.