मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातले शहीद पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज मुंबईत पोलिस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी हुतात्म्यांच्या कुटुंबियांनीही आदरांजली वाहिली. त्याआधी मुंबई पोलिसांच्या पथकानं संचलन करत हुतात्म्यांना मानवंदना दिली. गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, वरिष्ठ पोलिस आणि सनदी  अधिकारी या वेळी उपस्थित होते.

२६-११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना मुंबईत विविध ठिकाणी आज अभिवादन करण्यात आलं. समाजमाध्यमातून नागरिकांनी मुंबई पोलिसांसह सुरक्षा दलातल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समाजमाध्यमातून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

२६-११ च्या हल्ल्यात शाहिद झालेले पोलीस सहाय्यक निरीक्षक तुकाराम ओंबळे यांचं सातारा जिल्ह्यातलं मुळ गाव केडांबे इथं आज हल्ल्यातल्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेलसह मुंबईत सहा ठिकाणी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात १६० पेक्षा जास्त नागरिकांना प्राण गमवावे लागले.