मुंबई : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने 21 लाख 19 हजार 440 रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार कोरोनाच्या लढ्यासाठी दिला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालय येथे काल (दि.15) हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बँकेचे पदाधिकारी प्रदीप पाटील, धर्मराज मुंडे, सरव्यवस्थापक दिलीप दिघे उपस्थित होते.

‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक व्यक्ती, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी समाजाच्या विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने 21 लाख 19 हजार 440 रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्यात आला आहे.